अहिल्यानगर -शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादातून गुंड विजू पठारे आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने भीषण हल्ला केला. झेडपी कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता भिवषण घोरपडे यांचा मुलगा अविनाश याला भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेण्यात आले होते. तिथे विजू राजू पठारे याने कोयत्याने, तर अजय राजू पठारे याने तलवारीने अविनाशवर सपासप वार केले. सनी रणजीत चावरे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली, ज्यामुळे अविनाश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील मध्ये पडले असता निलेश ससाणे याने त्यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले.
हा हल्ला इतका क्रूर होता की अविनाशचे हात-पाय मोडले असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आरडाओरड झाल्याने नागरिक मदतीला धावले, तेव्हा आरोपींनी तिथून पळ काढला. या प्रकरणी किरण मोहन जेधिया, सनी चावरे, विजू पठारे, अजय पठारे आणि निलेश ससाणे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जगदीश भांबळ या घटनेचा पुढील तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.


