राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : मतदारसंघाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू
२३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध पथके स्थापन
निवडणुकीच्या कामासाठी २३ समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
अहिल्यानगर, दि. १६ – भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीसाठीची अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ एप्रिल रोजी होईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. मतदान २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ४ मे रोजी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मे २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे तहसीलदार अमित पवार काम पाहणार आहेत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे ठिकाण राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुने सेतू कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे.
मतमोजणीचे ठिकाण लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राहुरी येथे राहणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिली.
या पोटनिवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी ५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा ४० लाख रुपये राहील.
मतदान प्रक्रियेसाठी एकूण ५९८ बॅलेट युनिट, ६१४ कंट्रोल युनिट आणि ६०६ व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून मतदारांना मतदानाची खात्री व्हावी यासाठी सर्व ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे.
मतदारसंघात एकूण ३७४ मतदान केंद्रे असून १५ मार्च २०२६ च्या मतदार यादीनुसार एकूण ३ लाख ३३ हजार १८३ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार ८५ पुरुष, १ लाख ६१ हजार ९७ महिला आणि ०१ इतर मतदार आहे. तसेच १ हजार ५२ सैनिक मतदार आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी जिल्ह्यात विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये ६ एफएसटी , ६ एसएसटी, ३ व्हीएसटी आणि १ व्हीव्हीटी पथके २४ तास (24 X 7) कार्यरत राहतील. विनापरवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्हे लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक, झेंडे लावणे व इतर कारणाने मालमत्ता विरूपित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोईसाठी जिल्हा संपर्क केंद्रात १९५० हा टोल- फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून निवडणूक कालावधीत हे केंद्र २४x७ सुरू राहणार आहे.
आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी मोबाईलवरील सी-व्हिजील ॲपद्वारे करता येणार आहेत.
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी व कोविड बाधित मतदारांसाठी घरबसल्या मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेचीही सोय करण्यात आली आहे. ३७४ मतदान केंद्रांवर प्रत्येकी ५ कर्मचारी व १ पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राजकीय पक्ष अथवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रस्तावित केलेल्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज संदर्भातील तक्रारींची तपासणी तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, केबल नेटवर्क, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क व सोशल मीडियावरील जाहिरातींचे निरीक्षण करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक विषयक विविध कामकाजासाठी २३ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय मतदार जागरूकतेसाठी स्वीप कार्यक्रम, सर्व ३७४ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग , तसेच ३ आदर्श मतदान केंद्रे, १ पूर्णपणे महिला संचलित, १ दिव्यांग आणि १ युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित मतदान केंद्र अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिली.


