राज्य विधिमंडळातील आमदारांच्या स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करून फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मानधन चाळीस हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन ३० हजार रुपये होणार आहे.
भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. सध्या स्वीय सहाय्यकांना दरमहा ३० हजार रुपये, तर वाहनचालकांना २० हजार रुपये मानधन दिले जाते. अनेक वर्षांपासून या मानधनात वाढ झालेली नसल्याने स्वीय सहाय्यकांचे मानधन ४० हजार रुपये आणि वाहनचालकांचे मानधन ३० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन दिल्याचेही सभागृहात नमूद करण्यात आले.
यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या मार्च महिन्यापासून प्रलंबित असून, विधिमंडळ सचिवालयाने तो संसदीय कार्य विभागाकडे पाठविला होता. मात्र, विविध त्रुटींचा उल्लेख करून हा प्रस्ताव वारंवार परत पाठविण्यात आल्याची माहिती सदस्यांनी दिली. आता सर्व त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा संसदीय कार्य विभागामार्फत वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची आठवण करून देताना दरेकर यांनी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना आवाहन करत, या मानधनवाढीमुळे शासनावर फारसा आर्थिक भार पडणार नसल्याने सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी विनंती केली.यावेळी आणखी एक महत्त्वाची मागणीही करण्यात आली. आमदारांकडे कार्यरत असलेल्या दुसऱ्या स्वीय सहाय्यकाला मानधन देण्याची अपेक्षा नसली तरी त्यांना किमान विधिमंडळाचे अधिकृत ओळखपत्र (आयकार्ड) देण्यात यावे. आयकार्ड नसल्यामुळे विविध शासकीय कार्यालये आणि विधिमंडळ परिसरात कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली असून प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. फाईल आता वित्त विभागाकडे पाठविण्यात आली असून, मानधनवाढीबाबतचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


