राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघात काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला. आता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी भूमिका मांडली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाकेंच्या या भूमिकेवर आता पवार कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसंदर्भाने बोलताना, याबाबत सुप्रियाताईंनी भूमिका मांडली आहे, बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीने सोडवू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. तर, लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. प्रत्येकाला निवडणुकी लढण्याचा अधिकार आहे, कोणी कुठेही निवडणूक लढू शकतो, ही लोकशाही आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.


