अहिल्यानगर -निंबळक परिसरात जुन्या ओळखीच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल लक्ष्मण पवार (वय १९, रा. निंबळक) हे आपल्या नातेवाईकाला आणण्यासाठी नागापूरकडे जात होते. यावेळी पांडुरंगनगरी चौकात आरोपी अथर्व राजेंद्र जाधव (रा. निंबळक) याने त्यांना रस्त्यात अडवले. काही कळण्याच्या आतच आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने कुणाल यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना जखमी केले.
मारहाण एवढ्यावरच थांबली नाही, तर आरोपीने कुणाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील कोयता फिर्यादीच्या गळ्याला लावून, “तू पुन्हा रात्री इकडे फिरताना दिसला तर तुला जिवे ठार मारून टाकीन,” अशी धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी कुणाल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी अथर्व जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सांगळे हे करत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


