अहिल्यानगर शहरातील लालटाकी परिसरात किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (17 मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. योगेश दीपक कांबळे (वय 32, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु मुरलीधर काळोखे (रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. योगेश कांबळे यांना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पुतणीने फोन करून राजू मुरलीधर काळोखे हा त्यांच्या घरी येऊन वहिनीला शिवीगाळ करत दमदाटी करत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच योगेश कांबळे हे कामाच्या ठिकाणाहून तातडीने घरी परतले. त्यावेळी संशयित आरोपी तेथून निघून गेल्याचे समजले. घटनेची विचारपूस करण्यासाठी ते संशयित आरोपीच्या घरी गेले असता, त्याने संतापून हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.या हल्ल्यातून बचाव करताना योगेश जखमी झाले आहेत. तसेच संशयित आरोपीने त्यांना व त्यांच्या भावाला शिवीगाळ करत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, त्यांच्या भावाची नोकरी घालवण्याची धमकीही संशयित आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार तन्वीर शेख करीत आहेत.


