अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला असून या घटनेमुळे संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी ठाम व आक्रमक मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करत प्रशासनाला जाब विचारला. तसेच येत्या बुधवारपर्यंत आरोपी अटक न झाल्यास सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देत प्रशासनाला इशारा दिला आहे.
या वेळी मयूर कुलथे, प्रमोद बोऱ्हाडे, प्रकाश लोळगे, विजय देवळालीकर, अनिकेत बागडे, आनंद नांदूरकर, राहुल कुलथे, संतोष देडगावकर, वैजनाथ चिंतामणी, विजय कुलथे, प्रकाश हिंगणगावकर, श्याम मुंडलिक, विजय जगदाळे आदींसह अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनात तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले की,
“वडगाव पान येथे सहा वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला होणे ही अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. या घटनेला संबंधित पोलिस यंत्रणा व प्रशासन जबाबदार आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असून खाकीचा धाक उरलेला नाही. त्यामुळेच अशा विकृत प्रवृत्तींचे लोक निर्भयपणे गुन्हे करत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये हजारो मुली व युवती शिक्षण घेत आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार जगताप यांनी प्रशासनास पुढील सूचना केल्या – शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित गस्ती पथके नेमावीत, या गस्ती पथकांमध्ये महिला पोलिसांचा समावेश करावा, गस्ती पथकाच्या भेटींची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवावे, शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, प्रत्येक शाळा व महाविद्यालयात कायमस्वरूपी पोलीस नियुक्तीचा विचार करावा
तसेच या सर्व उपाययोजनांबाबत प्रशासनाने सविस्तर लेखी अहवाल तात्काळ सादर करावा, अशीही त्यांनी मागणी केली.
आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,
“येत्या बुधवारपर्यंत आरोपीला अटक झाली नाही, तर सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही.
विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला; खाकीचा धाक संपला का? आमदार संग्राम जगताप आक्रमक
- Advertisement -


