स्व. अरुण काका जगताप जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

स्व. अरुण काका जगताप जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

साई द्वारका सेवा ट्रस्टचा पुढाकार; १५ नामांकित रुग्णालयांतून मोफत तपासणी
आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद – आ. संग्राम जगताप

मोफत तपासणी, आयुष्यमान कार्ड वाटप आणि गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा खर्चही ट्रस्ट उचलणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर मनपा तसेच आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
समाजामध्ये आरोग्याबाबतच्या नवनवीन समस्या निर्माण होत असून, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नागरिक आरोग्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत आहेत. दिवसेंदिवस आरोग्यसेवा महाग होत चालल्यामुळे सर्वसामान्य नागरिक उपचारांपासून दूर राहतात. अशा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांच्या आजारांचे वेळेवर निदान होऊन योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने साई द्वारका सेवा ट्रस्ट सातत्याने कार्यरत आहे. ट्रस्टचे आरोग्य क्षेत्रातील कार्य अत्यंत कौतुकास्पद असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कामही ते करत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम केले आहे. तसेच सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्डचे वाटप करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर मनपा व आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या वतीने आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, भाजप गटनेते शारदाताई ढवण, माजी सभापती अविनाश घुले, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक निखिल वारे, गणेश कवडे, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, ऋग्वेद गंधे, ह.भ.प. अमित महाराज धाडगे, बाबासाहेब सानप, सागर मुर्तडकर, ज्ञानेश्वर रासकर, डॉ. प्रकाश गरुड, रोहन सानप, अभिजीत बोरुडे, सुशांत जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी नेहमीच समाजहितासाठी कार्य करत गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासणे हीच खरी श्रद्धांजली आहे.
ते पुढे म्हणाले की, नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे कार्य साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या महाआरोग्य शिबिरामध्ये शहरातील सुमारे १५ नामांकित रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्डचे वाटपही करण्यात आले.
या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांच्या पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
स्व. अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या महाआरोग्य शिबिरातून हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली असून, अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles