पारनेर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बँकेवर प्रशासक म्हणून पारनेरचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) विकास जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रशासकीय व्यक्तीचे आदेश आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच दिले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रशासक म्हणून पारनेरचे सहायक निबंधक जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी व कार्यालयीन अधीक्षक दीपक वाघमोडे यांनी बुधवारी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या पारनेर मुख्य कार्यालयात जाऊन प्रशासकाचा पदभार घेतला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व सहकार खात्याच्या नियमानुसार पुढील कारभार पाहणार आता प्रशासक म्हणून जाधव पाहणार आहेत. या सैनिक बँकेच्या पारनेर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच काही संचालकांनी रिझर्व्ह बँकेचे नियम पाळले नाहीत. त्यांनी चार कोटी तीन लाख ५७ हजार ९४९ रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. याबाबत विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी चौकशीअंती पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
यात बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, उपाध्यक्ष जयसिंग मापारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्यासह संचालक व कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी उपाध्यक्ष जयसिंग मापारी संचालक संजय तरटे व शिवाजी सुकाळे यांना जामीन मंजूर झाला आहे, तर अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांना अटी व शर्ती लागू करत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.


