अहिल्यानगर बनावट दूध प्रकरण : 15 संशयित आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर; दोघांना अटक

अहिल्यानगर -घातक क्रिमपासून बनावट दूधाची निर्मिती करून विक्री केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार असलेल्या 12 संशयित आणि अटकेतील तिघे अशा 15 जणांचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक संशयितांची संख्या पाच झाली आहे.

एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी छापा टाकून बनावट दूध तयार करण्याचा धंदा उघडकीस आणला होता. पॅराफिन (मिनरल ऑइल), 9.5 नावाचे केमिकल, मिल्क क्रिम आणि पाणी यांचे मशीनव्दारे एकत्रित मिश्रण करून घातक क्रिमची निर्मिती केली जात होती.

एक लीटर क्रिमपासून सुमारे 20 लीटर बनावट दूध तयार करून ते विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात समीर कमरूद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्‍वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी जामिनासाठी श्रीगोंदा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.

दरम्यान, या बनावट दूध धंद्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यासह बीड, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 31 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. आरोपी झाल्यापासून ते पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तपास करीत आहेत. त्यांनी किरणकुमार भास्कर रोहकले (रा. श्रीरामपूर) व अर्जुन हरीश्‍चंद्र जगदाळे (रा. नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पसार असलेल्या संशयितांपैकी 12 जणांना अटकपूर्वसाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेतली. त्या 12 संशयितांचे जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

महेश तुकाराम मोकाटे, दत्तात्रय अंबादास कराळे (दोघे, रा. अहिल्यानगर), राहुल नानासाहेब पवार (रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी), नितीन उत्तम केकाण (रा. निफाड, जि. नाशिक), किरणकुमार भास्कर रोहकले (रा. वार्ड नंबर 3, श्रीरामपूर), शामराव बाबुराव माने (रा. आष्टी, जि. बीड), हरिदास एकनाथ गोपाळघरे (रा. जामखेड), सुनील आण्णासाहेब ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), मनीष शांतावण पटेकर, गौरव मनीष पटेकर (दोघे रा. राहुरी), रंगनाथ काशीनाथ ढुस (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), चंद्रकांत आण्णा बर्डे (रा. राहुरी) या 12 संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles