पाथर्डी तालुक्यात खळबळ !कॅनॉलमध्ये आढळला गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह

पाथर्डी तालुक्यात एका खळबळजनक घटनेने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कासार पिंपळगाव शिवारात असलेल्या मुळा पाटबंधारे कॅनॉलमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२७ मार्च) सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, प्राथमिक दृष्ट्या हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर येत आहे.

कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीच्या जवळून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये स्थानिकांना एक पांढऱ्या रंगाची गोणी संशयास्पद रितीने तरंगताना दिसली. या गोणीला दोरीने घट्ट बांधण्यात आले होते. संशय बळावल्याने नागरिकांनी तातडीने पाथर्डी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक लोकांच्या मदतीने ती गोणी पाण्याबाहेर काढली. गोणीचा एक भाग फाटलेला असून त्यातून मृतदेहाचा पाय बाहेर दिसत होता, तसेच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.

गोणी उघडल्यानंतर त्यात अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, या महिलेचा मृत्यू कोणत्याही धारदार शस्त्राने नव्हे, तर कठीण आणि बोथट वस्तूने डोक्यात किंवा शरीरावर प्रहार केल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेच्या वर्णनावरून तिची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर महिलेचा रंग गोरा असून उंची सुमारे १६० सेंटीमीटर आहे. मृतदेहाच्या अंगावर जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि काळा ब्लाऊज आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि हातामध्ये काचेच्या बांगड्या आहेत. ओळख पटवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे, मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘पाच आसरा’ असे गोंदलेले आहे. मृतदेह काही प्रमाणात कुजलेला असल्याने ही हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही महिला नेमकी कुठली आहे आणि तिला ठार मारून मृतदेह कॅनॉलमध्ये कोणी फेकला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचीही पडताळणी केली जात आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाची कोणतीही महिला बेपत्ता असल्यास किंवा या गुन्ह्याशी संबंधित काही माहिती असल्यास तातडीने पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles