मी महादेवाचा अवतार आहे आणि तू पार्वती आहेस माझी असं म्हणत एका स्वयंघोषित धर्मगुरू ने या महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून या बाबाला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित पीडित महिलेने वसई येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित धर्मगुरु चे नाव आहे. पुणे पोलिसांनी वैद्य याला पिंपरी मधून अटक केली. वैद्य याच्यावर पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ३५ वर्षांची असून पुण्यात वास्तव्यास आहे. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये तिची वसई येथील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री करून जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला.
यावेळी “मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस,” असे तिला सांगितले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, हे नाशिक मधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि तिथून हा गुन्हा पुण्यात वर्ग झाला.


