एकनाथ शिंदे यांना धक्का,दोन बड्या नेत्यांचा राजीनाम्याचा इशारा

राज्यातील साताऱ्यात भाजप आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता धाराशिवमधून जिल्हा परिषदेच्या सभापतीपदावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आला आहे. या वादामुळे पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा आदेश पदाधिकारी मानत नसल्याचे आरोप करत शिंदे सेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि त्यांच्या आईने परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर दुसऱ्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला संधी दिली जाते. परंतु जिल्ह्यात निष्ठावंतांना डावललं जात आहे, असा आरोप शिंदे गटाचे नेते आनंद पाटील यांनी केला. आनंद पाटील यांच्या आरोपामुळे जिल्ह्यात तिसऱ्यांदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आनंद पाटील आणि त्यांच्या आई देखील कानेगाव जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. त्यांनी सभापती पदापासून डावल्यामुळे नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदेंचा आदेश स्थानिकचे पदाधिकारी पाळत नाहीत, असा आरोप आनंद पाटील यांनी केला. त्यांनी शिंदे गटातील गटबाजीला कंटाळून स्वतःसह आईच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत खदखद सुरूच असल्याचे समोर येत आहे.

धाराशिवमधील शिंदे गटाचे नेते आनंद पाटील आणि त्यांच्या आई या कानेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आहेत. धाराशिव जिल्हा परिषद झेडपीचे अध्यक्षपद सध्या अर्चना पाटील यांच्याकडे आहे. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत. तर उपाध्यक्षपद शिंदे गटाकडे आहे. उपाध्यक्षपद हे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी ऊषा गायकवाड यांच्याकडे आहे. या परिषदेत सभापतीपदाच्या चार जागा होत्या.

धाराशिव जिल्ह्यात परिषदेत सत्ता स्थापन्यासाठी महायुती एकत्र आली आहे. जिल्हा परिषदेत भाजपकडे दोन सभापती पदे आहेत. तर शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक सभापतीपद आहे. अर्थ आणि बांधकाम खात्याचे सभापतीपद भाजपच्या सिद्धेश्वर कोरे आणि समाजकल्याण सभापतीपद भाजप नेते विश्वास कोकणे यांच्याकडे आहे. तर राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब खरसडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद आहे. तसेच शिंदे गटाच्या पूजा शिंदे यांच्याकडे बालकल्याण सभापतीपद आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles