भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झालाय. आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातातून खासदार पडोळे आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. मात्र एकाच मार्गावर आणि एकाच पद्धतीने खासदार पडोळे यांच्यासोबत तिसरा अपघात झाला आहे. त्यामुळे यामागे घातपाताचा कट तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याकरिता खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. सकाळी त्यांचा ताफा नागपूरजवळील हल्दीराम समोर आला होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की खासदारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, एअरबॅग्ज आणि वेळेत मिळालेल्या संरक्षणामुळे डॉ. पडोळे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.या अपघातामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, डॉ. पडोळे यांच्यासोबत याच मार्गावर झालेला हा तिसरा अपघात आहे. तिन्ही वेळा अपघात एकाच मार्गावर झाले आहेत. तिन्ही वेळा ताफ्यातील गाडीला ‘ट्रक’नेच धडक दिली आहे. अपघाताची पद्धतही तिन्ही वेळेस सारखीच असल्याचे समोर आले आहे.
खासदार डॉ. पडोळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. धडक देणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. डॉ. पडोळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


