पारनेर तालुक्यात बिबट्याचा थरार एक बिबट्या जेरबंद; साथीदाराला सोडवण्यासाठी दुसऱ्या बिबट्याचा थरार!

पारनेर -तालुक्यातील किन्ही-बहिरोबावाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला बिबट्याचा थरार अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी पहाटे या परिसरातील महादेव मंदिर परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या जेरबंद झाला. मात्र, पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या जोडीदाराला सोडवण्यासाठी दुसऱ्या एका बिबट्याने (मादीने) चक्क पिंजरा १५ फूट लांब ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एका बाजूला सुटकेचा निश्वास टाकला जात असतानाच, दुसरीकडे मुक्त असलेल्या मादी बिबट्यामुळे भीतीचे सावट कायम आहे.

​२ डिसेंबर रोजी भागुबाई खोडदे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी नगर-कल्याण महामार्गावर ‘रास्तारोको’ आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या वनविभागाने तातडीने उपाययोजना राबवत गेल्या तीन महिन्यांत चार बिबट्यांना जेरबंद केले होते.

​गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांवरील हल्ले पुन्हा वाढले होते. शनिवारी व रविवारी महादेव मंदिर परिसरात दोन बिबट्यांचा वावर दिसल्याने वनविभागाने रविवारी दुपारी तिथे पिंजरा लावला. सोमवारी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. विशेष म्हणजे, बाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्याने पिंजऱ्यातील आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी अक्षरशः ताकद लावून पिंजरा १५ फूट अंतरावर ओढत नेला. बिबट्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा घबराट पसरली आहे.

​ही यशस्वी मोहीम राबवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के.एस. साबळे, वनरक्षक एन.व्ही. बडे, बी.एस. दवणे, दत्तू नर्हे, किशोर गुंजाळ आणि चालक दिगंबर विरोळे यांनी परिश्रम घेतले. तसेच अनिल देठे पाटील, गंगाधर देठे, विनोद खोडदे, अभिजीत खोडदे यांच्यासह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. पाचवा बिबट्या जेरबंद झाला असला तरी, अद्याप एक मादी बिबट्या परिसरात मुक्त असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles