नगर – पुणे महामार्गावरील हॉटेल मध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या (एएचटीयु) पथकाने छापा टाकत ४ पिडीत महिलांची सुटका केली आहे. या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या हॉटेल चालकासह दोघांवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पो.नि. रविंद्र देशमुख यांना ३१ मार्च रोजी नगर पुणे रोडवरील जातेगाव (ता.पारनेर) शिवारात हॉटेल जयराज येथे वेश्या व्यवसायाकरिता महिलांना रूम उपलब्ध करून देवून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पो.नि. देशमुख यांनी नियंत्रण कक्षातील पो.नि. हमीद शेख यांच्या सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पो.नि. हमीद शेख यांनी पथकासह जावून पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री करून हॉटेल जयराज येथे जावून छापा टाकला असता सदर ठिकाणी कलंदर सत्तारअली शेख (रा. वडू रोड, कोरेगाव भिमा, ता. शिरूर जि. पुणे), हनुमंत अशोक देटके (रा. नागटापी, सासपडी, ता.जि. सातारा) हे दोघे मिळून आले. तसेच सदर ठिकाणी असलेल्या रूमची झडती घेतली असता सदर ठिकाणी रूममध्ये ४ महिला मिळून आल्या. सदर महिलांची सुटका करण्यात आलेली असून दोघा आरोपींना ताब्यात घेवून आरोपी व पिडीत महिला यांना सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. दोघा आरोपींवर सुपा पोलीस स्टेशन येथे स्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक गणेश उगले, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख, स.फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, अनिता पवार, चालक पो.कॉ. एस.एस. काळे यांच्या पथकाने केली आहे.


