सारसनगर-बुरुडगाव रोड परिसरात घरफोड्यांची मालिका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
समता नगर ते नानाजी नगरपर्यंत चोरट्यांचा धुमाकूळ; सीसीटीव्हीत कैद, तात्काळ अटकेची मागणी
अभिनव कॉलनी, बकली, फुलसौंदर मळा, ओम कॉलनी, महादेव मंदिर परिसरही टार्गेट
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील सारसनगर भागात घरफोड्यांची मालिका सुरू असून चोरट्यांनी विविध भागात डल्ला मारत नागरिकांची झोप उडवली आहे. समता नगर, अभिनव कॉलनी, , फुलसौंदर मळा, ओम कॉलनी, नानाजी नगर तसेच महादेव मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागांमध्ये मिळून आठ ते दहा घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली असून चोरटे रात्रीच्या वेळी घरांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असूनही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे निवेदन देत चोरट्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातत्याने होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांनी तातडीने तपास गतीमान करून आरोपींना अटक करावी. तसेच संबंधित परिसरात पोलीस गस्त वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर कारवाई होऊन चोरट्यांना अटक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


