प्रवरा परिसरातील उंबरी बाळापूर शिवारात बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवरा डाव्या कालव्याच्या रस्त्याने उंबरीकडून आश्वीकडे येताना लेंडी पुलाजवळून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर आणि त्यानंतर काही वेळातच एका डॉक्टरवर बिबट्यानें झडप घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अभिषेक केशव खेमनर (वय ३४), सार्थक सुनील खेमनर (वय १७ दोघेही रा. आश्वी ) व डॉ. मारुती उंबरकर (वय ५२ रा. उंबरी बाळापुर) असे जखमींची नावे आहेत.आश्वी बुद्रुक येथील अभिषेक केशव खेमनर आणि सार्थक सुनील खेमनर हे मोटार सायकलवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे दोघांनीही मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून बापूसाहेब निर्मळ, संदीप भुसाळ, विलास निर्मळ, सोमनाथ शिंदे, सचिन शिंदे, पप्पू होडगर आणि पप्पू निर्मळ आदी ग्रामस्थ मदतीसाठी धावले. नागरिकांची गर्दी पाहून बिबट्याने तेथून पळ काढला.
या घटनेनंतर काही वेळातच उंबरी येथील डॉ. मारुती उंबरकर हे घरी जाताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. तिघांच्या पायाला, मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. तिन्ही जखमींना निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा कार्यालयाने तत्काळ जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवले.
दरम्यान, माहिती मिळताच वनपाल आर. के. पवार, वनसंरक्षक राहुल सातपुते, बाळासाहेब डेंगळे आणि अरुण साळवे यांनी जखमींची विचारपूस आणि पंचनामा केला. उंबरी बाळापूर परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली.


