अहिल्यानगर-मनमाड या महामार्गाचे काम करणार्या कंत्राटदारांचे बिले काढायचे नाही, जर तुम्ही बिले काढले तर तुमच्याकडे बघुन घेईन, अशी धमकी देत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकाला महिन्याला 50 हजार रूपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमरिश माणिकराव मानकर (वय 50, मुळ रा. अकोला, हल्ली रा. चिखलठाणा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. किरण शिवाजी राऊत (रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता), संदीप भास्कर भगत (रा. बायपास रस्ता, शेंडी, ता. अहिल्यानगर) व अॅड. हर्षद चावला (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सावेडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अमरिश मानकर प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असून सध्या त्यांच्याकडे अहिल्यानगर येथील अतिरिक्त कार्यभार आहे. मजुर सहकारी संस्था पहिला मजला, मार्केटयार्ड, अहिल्यानगर येथे त्यांचे कार्यालय असून सदर कार्यालयाच्या मार्फतीने अहिल्यानगर- मनमाड महामार्गाचे काम चालू आहे. मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण राऊत, संदीप भगत आणि अॅड. हर्षद चावला हे तिघे गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात येऊन माहिती अधिकाराच्या नावाखाली वारंवार माहिती मागत होते.
सोमवारी (6 एप्रिल) हे तिघे कोणतीही परवानगी न घेता कार्यालयात घुसले. त्यावेळी किरण राऊत याने मानकर यांना धमकावत, तुम्ही आम्हाला महिन्याला 50 हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला काम करू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच तुमचे सर्व काही बाहेर काढू आणि रस्त्यावर फिरू देणार नाही, अशीही धमकी दिली. यानंतर बुधवारी (8 एप्रिल) पुन्हा किरण राऊत व संदीप भगत हे दोघे कार्यालयात आले आणि पैशांची मागणी करत दमदाटी केली. त्यांनी तुमचे काम बंद पाडू, उपोषण करू आणि ऑफिसबाहेर येऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच किरण राऊत याने मोबाईलवरून फोन करून कंत्राटदारांची बिले काढू नयेत, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित तिघे महामार्गावरील कामाच्या ठिकाणी जाऊन इंजिनियर, ठेकेदार व कामगारांचे फोटो काढून वाद घालत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण होत असून स्वतःच्या जीवितास धोका असल्याची भावना व्यक्त करत मानकर यांनी तिघांविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


