पाथर्डी तालुक्यातील एका 31 वर्षीय विधवा महिलेवर तिच्याच दीराने सुमारे चार वर्षांपासून जमिनीच्या वाटणीचे अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 29 मार्च 2026 रोजी रात्री दीराने घरात घुसून महिले विरुद्ध अत्याचार केल्याची घटना घडली आहे. महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात दीराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, महिलेचा नवरा सुमारे आठ वर्षांपूर्वी मयत झाला असून ती आपल्या मुलगा व मुलगीसह राहते. शेती व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. दीर हा शेजारीच सासरे-सासूंसह राहतो. 2022 मध्ये महिलेने आपल्या हिश्याची शेती वाटून मागितली असता, दीराने शेती हवी असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी अट घातली. नकार दिल्यावर त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि कोणाला सांगितलेस तर तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
या भीतीमुळे महिला गप्प राहिली. त्यानंतर दीराने वेळोवेळी जमिनीच्या वाटणीसाठी अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 29 मार्च 2026 रोजी रात्री जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. नंतर पुन्हा शेतीची वाटणी मागितल्यावर तुला व तुझ्या मुलांना जीवे मारून टाकीन, तू कोठेही गेलीस तरी शेती वाटून देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी 31 वर्षीय महिलेने पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दीराविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.


