अहिल्यानगर : बुरुडगाव येथील एका तरुणाला आपल्या मुलांना भेटण्यासाठी सासरी जाणे महागात पडले आहे. आपल्या पोटच्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पित्याला पत्नीसह सासरच्या पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काटवण खंडोबा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मुन्ना गणी पठाण हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी मागील पाच वर्षांपासून मुलांसह माहेरी राहते. घटनेच्या दिवशी मुन्ना पठाण हे आपल्या दोन मुलांना भेटण्यासाठी सासरी गेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या त्यांच्या पत्नीने व सासूने तू इथे का आलास? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीने फोन करून आपले वडील व भावाला तिथे बोलावून घेतले. विवाहितेचे वडील सिराज पठाण, भाऊ सफिराज पठाण, सासू राईसा पठाण आणि भावाची पत्नी यांनी मुन्ना यांना घेराव घालून लाकडी दांडयाने मारहाण केली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
—————————————————————————————————————————————————
ग्रामपंचायत समोर राडा
अहिल्यानगर: सार्वजनिक ठिकाणी मद्याचे सेवन करून आरडाओरड करणार्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खातगाव टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास खातगाव टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आरोपी सचिन आबासाहेब सातपुते (वय ४३, रा. खातगाव टाकळी, ता. जि. अहिल्यानगर) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. आरोपीने मद्याच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून बेशिस्त वर्तन केले.


