अशोक खरात याचा निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाले आहे. शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावर अपघातात त्यांचं निधन झाले आहे. ट्रकने शेळके यांच्या गाडीला जोरात धडक दिली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खरात प्रकरणाचा काही संबंध आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शेळके हे अशोक खरात याचे निकटवर्तीय होते. खरातला अटक केल्यानंतर शेळके प्रचंड तणावात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या बाजूला घुसली.
या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांची पत्नी बराच वेळ गाडीतच अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जितेंद्र शेळके हे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते, तसेच खरात यांच्या लॉन्समध्येही त्यांची भागीदारी होती, असे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मानसिक तणावाखाली होते.


