नगर शहरात महापालिका निवडणूकीचा वाद ; बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

अहिल्यानगर – महानगरपालिका निवडणुकीच्या जुन्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तपोवन रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सागर दत्तात्रय ढवण (वय ३८, रा. तपोवन रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अजय उर्फ विकी दिलीप ढवण, ऋषीकेश सुनील ढवण, सागर पोपट पोळ, मयूर सुरेश मुळे आणि विजू बहीरु शिंदे (सर्व रा. ढवण वस्ती, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर ढवण यांचे इंडो आयरीश हॉस्पिटल शेजारी नवीन बांधकाम सुरू आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ढवण तिथे असताना सर्व आरोपी त्या ठिकाणी आले.

​”तुम्ही आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत खूप त्रास दिला आहे,” असे म्हणून आरोपींनी ढवण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी जवळ असलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने ढवण यांना बेदम मारहाण केली. यावेळी विकी ढवण याने आपल्या गळ्यातील पंच्याने फिर्यादीचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ढवण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी पथकासह भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles