मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्यास ठोसे लगावल्याने वादग्रस्त बनलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. दिवंगत कामगार नेते गोविंद पानसरे लिखित ‘ शिवाजी कोण होता ‘ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार गायकवाड यांनी पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्य भाषा वापरली आहे. पानसरे यांच्याप्रमाणे तुलाही वर पाठवले जाईल, असे म्हणत गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना जीभ हासडून टाकू, अशी धमकी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी डाव्या, पुरोगामी चळवळीच्या संघटनांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे. तेथे आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कामगार नेते गोविंद पानसरे यांनी ३८ वर्षांपूर्वी शिवाजी कोण होता हे ७० पानी पुस्तक लिहिले. अनेक भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सर्वकालीन सर्वविक्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाची नोंद झालेली आहे. तर, शीर्षकावरून हे पुस्तक अनेकदा वादग्रस्त बनलेले आहे.
बुलढाणा येथे एका कार्यक्रमा वेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. त्याची एक प्रत आमदार गायकवाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी काल रात्री बारा वाजल्यानंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला.
सुरुवातीला भाऊ असे नम्रतेने सुरुवात करताना नंतर आमदार गायकवाड यांचा पारा चांगला तापला. त्यांनी पुस्तकाच्या शीर्षकावरून आंबी यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. पुस्तकाच्या शीर्षकांतून शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत त्यांनी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोल्हापुरात त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अरे, गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचे काय झाले, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली.
हे पुस्तक १९८८ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही, तुम्ही आधी ते पुस्तक वाचा, असे संजय गायकवाड यांना सांगून पाहिले. मात्र, वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गायकवाड यांनी काहीही ऐकून न घेता प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे चालू ठेवले. मात्र, प्रशांत आंबी यांनीही न धीटपणे संजय गायकवाड यांना, ‘ मी झोपडपट्टीत राहतो मलाही तुमच्यापेक्षा आरवचे शिव्या करता येते पण आमच्यावर संस्कार आहेत आम्ही असे काही बोलणार नाही,असे सांगून तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या’, असे प्रतित्तुर दिले. दहा मिनिटाच्या या संभाषणामध्ये आंबी हे वारंवार पुस्तकाचे महत्व समजून सांगतानाच आमदार गायकवाड यांना अशी धमकीची भाषा बोलण्यापेक्षा आधी पुस्तक नीटपणे वाचा, मग त्यावर बोला, असे सांगत होते.
शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप, शिवीगाळ आणि मारहाणीची आमदार संजय गायकवाड यांची धमकी
- Advertisement -


