अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाला अटक; नेमक प्रकरण काय?

पारनेर-तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे यांचा मुलगा स्वराज आझाद ठुबे याला मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. दीड कोटींच्या बोगस कर्जप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, जिल्हा न्यायालयाने त्याला सोमवार दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. स्वराज ठुबे याने ‘राजे शिवाजी’ पतसंस्थेसह इतरही काही संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलल्याचे समोर आले असून, या आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

६० ते ७० कोटींच्या या कथित घोटाळ्यात चेअरमन आझाद ठुबे यांना २१ जुलै २०२४ रोजी त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. लेखापरीक्षण अहवालातून असे स्पष्ट झाले आहे की, चेअरमन, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता किंवा विनातारण आपल्या नातेवाईकांना मोठ्या रकमांचे वाटप केले. यात स्वराज ठुबे याच्या नावे दीड कोटींचे बोगस कर्ज दाखवण्यात आले होते.याप्रकरणी बाळासाहेब तुकाराम वाळुंज यांच्यासह सूर्यभान मेहेत्रे, गोविंद पवार, पोपट भालेकर आणि तान्हाजी खोडदे यांसारख्या अनेक ठेवीदारांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घोटाळ्याप्रकरणी आझाद ठुबे यांच्यासह उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार, कार्यकारी संचालक संभाजी भालेकर आणि इतर संचालकांसह एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये उदयकुमार सोनावळे, भगवंत उर्फ नंदकुमार ठुबे, विजय काकडे, संतोष ठुबे, भाऊसाहेब नवले, प्रमोद लोंढे, संतोष कोठारी, किशोर शिंदे, साहेबराव जेजुरकर, ज्योती ठुबे आणि सारिका पोपळघट यांचा समावेश आहे. यापैकी काही संचालकांना अटकपूर्व जामीन मिळाला असला, तरी आझाद ठुबे यांची पत्नी आणि इतर नातेवाईक अद्यापही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. स्वराज ठुबेच्या अटकेमुळे या प्रकरणातील आर्थिक गुंतागुंत सुटण्याची शयता निर्माण झाली असून, पोलीस आता अधिक सखोल तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles