बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असंही तोच म्हणत आहे. आता, बीड कारागृहातील कैदी सनी आठवलेची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
बीड येथील कारागृहात कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा असल्याचे त्याने म्हटले. तसेच, अजहर पठाणवर दबाव आणत आहेत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे, असेही तो सांगतो. या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंगमधून मागणी केली आहे.
कॉल रेकॉर्डिंगमधील सनी आठवलेच संभाषण
– अझहर पठाणला मारहाण झाली होती, त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत.
– वाल्मिक कराडला बंदी झालेली असताना रात्री साडेआठ वाजता बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे.
– रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले.
– सगळे अधिकारी त्याच्यावर दबाव आणत आहेत, 10 हजार रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो अशी वाल्मिक कराडने लालूच दिलं आहे.
– जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे.
– वाल्मिक कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोकं मारलेले आहेत.
– आणि आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागलेले आहेत.
– बाहेरच्या पथकाने इथे येऊन झडती घ्यायला पाहिजे.
– त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिम कार्ड आहेत ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो, आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे.
– सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय.
– वाल्मिक कराडला नवीन डिश टीव्ही दिली आहे. सगळी व्हीआयपी सुविधा भेटते त्यांना इथे.


