आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करावी; श्रीपाद छिंदम प्रकरणाप्रमाणेच कारवाईची मागणी

शिवाजी महाराजांचा अपमान प्रकरणी संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करावी
भाकपच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामुदायिक वाचन
गुन्हा दाखल करून अटक व्हावी; श्रीपाद छिंदम प्रकरणाप्रमाणेच कारवाईची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात आक्षेपार्ह, अश्‍लील वक्तव्य करुन प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन डिवायएसपी दिलीप टिपरसे यांना देण्यात आले असून, त्यांच्या मार्फत गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन त्यांना “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाची भेट देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करून गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे, ॲड सुधीर टोकेकर, इंजि. प्रशांत पाटिल, संध्या मेढे, भैरवनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, संजय वाघ, कॉ. फिरोज शेख, संजय झिंजे, अशोक सुर्यवंशी, कॉ. सुभाष कडलग, सुदाम लगड, विनायक गोरखे, राजु वैराळ, अनिल भोसले (भाकप माले राज्य सदस्य), प्रा. डॉ. महेबुब सय्यद, सोमनाथ केंजळे, युनुस तांबटकर, प्रविण सोनवणे, ॲड विद्या जाधव, दुर्गेश भोसले, आर्कि. अर्शद शेख, कॉ. अविनाश साठे, बापु चंदनशिवे, राजेंद्र कर्डिले, श्‍याम शिंदे, दिपक शिरसाठ, बापूराव राशिनकर, संदीप इथापे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार, दि. 22 एप्रिल 2026 रोजी रात्री 12.52 वाजता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात अत्यंत अश्‍लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब लोकशाही मूल्ये व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारी असल्याचे भाकपने स्पष्ट केले आहे.
यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाचा अपमान केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांचे वर्तन हे आमदार पदाला शोभणारे नसून राज्याच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारे असल्याची टीका करण्यात आली. “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक इतिहासाचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टी, समता आणि ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याची प्रेरणा देणारे हे महत्त्वपूर्ण लेखन असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रबोधनकार ठाकरे यांनी 1926 मध्ये “दगलबाज शिवाजी” हे पुस्तक लिहिले होते, तर गणेश कुऱ्हाडे यांनी 1939 मध्ये “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिल्याचा उल्लेखही करण्यात आला.
आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, जीवे मारण्याची धमकी, जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान व महिलांविषयी अश्‍लील वक्तव्य या गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, गोविंद पानसरे खून प्रकरणात आमदार गायकवाड यांची सखोल चौकशी करण्यात यावी, नगरमधील नगरसेवक श्रीपाद छिंदम प्रकरणाप्रमाणेच न्याय देत गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या सर्व अनधिकृत धंद्यांवर बंदी घालण्याची मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकशाही व्यवस्थेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत, अशा प्रकारच्या धमक्या व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles