जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याची माहिती आहे. नरेश साधूरावजी बर्वे (वय ५४) असे अधिकाऱ्याचे नाव असून महसूल सहाय्यक म्हणून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. या घटनेनंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शिवाजीनगर, महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी बर्वे यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर १७ आणि २० एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत बर्वे लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नंदनवन परिसरात तक्रारदाराने पंचासमक्ष आरोपीला लाचेची रक्कम दिली. बर्वे यांनी पाच लाख रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीतून पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, या रकमेत काही बनावट नोटांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे.


