अहिल्यानगर -जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७१ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेब्रुवारी जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग रचनेवर १३ एप्रिलपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी मुदत होती. दरम्यान, ७७१ ग्रामपंचायतींपैकी ६१८ ग्रामपंचायतींवर एकही हरकत दाखल नव्हती. तर १५३ ग्रामपंचायतींवर ३८४ हरकती दाखल झाल्या होत्या. यावर सुनावणी आता अंतिम टप्प्यात असून ४ मे रोजी या ७७१ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
राज्य सरकारच्यावतीने १७ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार, ३० मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर १३ एप्रिलपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानूसार जिल्ह्यातील ७७१ ग्रामपंचायतींच्या जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १५३ ग्रामपंचायतींवर ३८४ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. तर ६१८ ग्रामपंचायतीमध्ये एकही हरकत दाखल झाली नव्हती. दाखल हरकतींवर प्रातांधिकारी यांच्या पातळीवर सुनावणी सुरू असून त्या आता अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ७७१ ग्रामपंचायतीमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत निवडणुका होणार आहेत. प्रशासनाकडून प्रारूप रचना जाहीर करण्यात आलेली आहे. १३ एप्रिलपर्यंत नागरिकांनी हरकती नोंदवल्या असून दाखल हरकर्तीवर सुनावणी होवून निवडणूक आयोगाने मान्यतेनंतर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल.
जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतीमधील ८५ जागा रिक्त असून या ठिकाणी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यातील २१ जागा या बिनविरोध होणार असून या ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज दाखल आहे. तर ४९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पोटनिवडणूका या अकोले तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीमध्ये, संगमनेर ३, कोपरगाव आणि नेवासा ४, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत आणि श्रीरामपूर प्रत्येकी १, राहुरी ५, नगर ३, शेवगाव ६ यांचा समावेश आहे.
एकही हरकत दाखल नसलेल्या ग्रामपंचायती
अकोले ५०, संगमनेर ७४, कोपरगाव २३, श्रीरामपूर-१४, राहाता – १९, राहुरी ३७, नेवासा ५५, नगर- ४४, पारनेर – ७३, पाथर्डी- ५७, शेवगाव ४५, कर्जत-४२, जामखेड – ३६, श्रीगोंदा ४९ यांचा समावेश आहे.


