भागीदारीचा हिस्सा मागितल्याने
व्यावसायिकास बेदम मारहाण
नगर एमआयडीसी परिसरातील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर- एमआयडीसी परिसरातील कंपनीत असलेला भागीदारीचा हिस्सा मागण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाला आणि त्यांच्या मुलांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.याबाबत निघोज (ता. राहता )येथील रहिवासी रामदास किसन गडकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. नगर एमआयडीसी येथील श्रेया इंडस्ट्रीज कंपनीमध्ये त्यांचा भागीदारीचा हिस्सा आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गडकर हे त्यांचे पुत्र शुभम आणि निलेश यांच्यासह कंपनीत हिस्सा मागण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथे उपस्थित असलेले संदीप बापू गाडेकर, बापू नारायण गाडेकर, सुनंदा बापू गाडेकर आणि सूरज प्रदीप गाडेकर (सर्व रा. खारे कर्जुने,ता. अहिल्यानगर) यांनी त्यांना अडवले.भागीदारीच्या वादातून आरोपींनी गडकर आणि त्यांच्या मुलांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तुम्ही जर पुन्हा कंपनीच्या भागीदारीबद्दल विचारले तर तुम्हाला शहरात येऊ देणार नाही आणि आलात तर तुमचे हातपाय तोडून जिवंत मारून टाकू, अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादींनी उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१),११५ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पितळे हे करत आहेत.


