नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामखेड रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या महिला मोटार वाहन निरीक्षकाचे शासकीय वाहन अडवून त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल चारजणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन (वय 36, रा. गुलमोहर रोड सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या वायु वेग पथक क्रमांक 2 वर कार्यरत असताना 24 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. त्यांनी ओव्हरलोड असलेल्या एका सहा टायर ट्रकवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून तो ताब्यात घेतला होता.
सदर वाहन शासकीय कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना संशयित आरोपी संतोष भास्मा (रा. पिंपळा, ता. आष्टी जि. बीड), अजिनाथ बेरड (रा. निंबोळी ता. नगर), धोंडीराम तुळशीराम निक्रड (रा. मांडले, ता. नगर) आणि जगताप (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांनी त्यांच्या पांढर्या रंगाच्या क्रेटा कारने हुसेन यांचे वाहन अडवले. संशयित आरोपींनी हुसेन यांच्या ताब्यातील जप्त केलेले वाहन पळवून नेले आणि त्यांना तू नोकरी कशी करते ते बघतो अशी धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकार्याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


