केडगावात राजकीय गाण्यावरून राडा; लाकडी दांडक्याने तरुणाला मारहाण
अहिल्यानगर : शहरातील केडगाव उपनगरात राजकीय गाणे लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव धोंडीभाऊ कार्ले या तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
नेप्ती रोडवरील एकनाथ नगर भागात फिर्यादी गौरव कार्ले आणि त्यांचे मित्र निखिल देशमुख यांच्या लग्नाची मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक रात्री आठ वाजेच्या सुमारास सातपुते मळा परिसरात आली असता, आरोपी सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते आणि निलेश सातपुते यांनी मिरवणूक अडवली. “आमच्या घरासमोर राजकीय व्यक्तीचे गाणे का लावले?” असा जाब विचारत आरोपींनी वादाला सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपनिरीक्षक सेंदवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मिरवणुकीतील वादांमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
——————————————————————————————————–
डोंगरगण येथे बाप-लेकावर लोखंडी गजासह लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर: डोंगरगण परिसरातील गड मांजरसुंबा फाटा येथे एका हॉटेलसमोर जुन्या वादातून बाप-लेकास बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव आनंदा मते (वय ७४) आणि त्यांचा मुलगा पांडुरंग हे नेवासा येथून काम संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. वांबोरी रस्त्यावरील आबासाहेब पठारे यांच्या दुकानासमोर ते थांबले असताना, आरोपी अमोल बाळासाहेब मते आणि महेश बापू मते हे त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपींनी “तुला लई माज आला आहे, आज तुझा खेळच खल्लास करतो” असे म्हणत फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मुलाने शिवीगाळीचा जाब विचारला असता, दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अमोल मते याने हातातील लोखंडी गजाने पांडुरंग याच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरात प्रहार केला, तर महेश मते याने लाकडी दांडक्याने पाठीत मारहाण करून गंभीर दुखापत केली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीवर दगड आणि दांडके मारून नुकसान केले. “पुन्हा नादी लागलात तर अंगावर डंपर घालून मारून टाकू” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे करत आहेत.


