पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभांगासह कार्यकारिणी बरखास्त
तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांची माहिती
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी
पारनेर,प्रतिनिधी
पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार )विविध विभांगासह कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची घोषणा पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी पत्रकार परिषदेत केली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,जिल्हाध्यक्ष, खासदार नीलेश लंके यांच्या सूचनेनुसार कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे तरटे यांनी स्पष्ट केले.यावेळी शिक्षक नेते, बाजार समितीचे संचालक रा.या.औटी,माजी सभापती किसनराव रासकर, कॉग्रेसचे नेते शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे तरटे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका,शहर कार्यकारिणसह युवक, महिला, किसान सेल, डॉक्टर सेल,विधी सेल,ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल,अपंग सेल, सांस्कृतिक सेल आदी विभागांच्या अध्यक्षांसह कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे तरटे यांनी सांगितले.
लवकरच खासदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी बैठकांमध्ये चर्चा होणार आहे.खासदार लंके यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण होईल.या बैठकांमध्ये पक्षाच्या तालुका कार्यकारिणीसह विविध विभागांचे अध्यक्ष,
कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा होणार असल्याचे तरटे यांनी स्पष्ट केले.
आठ वर्षांपूर्वी,२०१८ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार ) तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.त्यानंतर सलग १५ वर्षे हुलकावणी देणारी आमदारकी पक्षाकडे आली.तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँकेचे संचालक पद यासह विविध निवडणुकांमध्ये यश मिळवले.याचे निश्चितच समाधान आहे.
-बाबासाहेब तरटे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)


