विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याकडून येत्या काही तासांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेयांनी बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश करुन विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. बच्चू कडू हे शिवसेनेत नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला होता. त्याऐवजी बच्चू कडू यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन करण्यासंदर्भात बराच खल झाला.
बच्चू कडू यांच्याकडून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. विधान परिषद निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना बच्चू कडू यांच्याकडून शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार आहेत. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, ते आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती विलीन झाल्यास शिवसेनेची ताकद वाढेल. मात्र, बच्चू कडू यांचे असलेले स्वतंत्र अस्तित्व पुसले जाईल. त्यामुळे आता बच्चू कडू काय निर्णय घेतात, हे बघावे लागेल.
बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे 2019 मध्ये दोन आमदार निवडून आले होते. बच्चू कडू स्वत: 2004, 2009, 2014 आणि 2019 ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात प्रहार संघटनेचे जाळे आणि बच्चू कडू यांची वैयक्तिक ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे बच्चू कडू प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर शिवसेनेची विदर्भातील ताकद वाढेल.


