जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे २८ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले.
शेवगाव, _ : शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे पाटील यांचे पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्याने अभ्यासू, धाडसी व जनतेसाठी झटणारे नेतृत्व गमावले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दिलीपराव लांडे पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी विचारसरणीशी निगडित राहून त्यांनी प्रभावी भाषणशैली, स्पष्ट विचार आणि जनतेच्या प्रश्नांवरील ठोस भूमिका यामुळे जनमानसात स्थान मिळवले. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. ते केवळ राजकारणी नसून लोकांच्या भावना जाणणारे जननेते म्हणून ओळखले जात होते.
शेतकरी, युवक, अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली विशेष होती. जायकवाडी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष करत आधार दिला. ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका बजावत सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य केले.
जोहऱापूर येथून त्यांनी शून्यातून राजकारणाची सुरुवात केली. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम करत घुले घराण्याच्या राजकीय बळकटीत मोलाचा वाटा उचलला. विविध निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण रणनीती आखून यश मिळवून दिले.
दिलीपराव लांडे पाटील हे पंचायत समिती शेवगावचे सभापती म्हणून कार्यरत होते. तसेच जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागाचे सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. त्यांच्या पश्चात मीराताई दिलीपराव लांडे यांनीही त्याच पदावर कार्य केले.
त्यांच्या निधनाने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य, नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम प्रेरणादायी राहील.


