Ahilyanagar….इन्स्टाग्रामवर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी; पोलिसांत गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: सोशल मीडियाचा गैरवापर करून एका दुकानदाराची आणि एका महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. एका तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.​नेवासा तालुक्यातील एका मोबाईल दुकानदाराने या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, एका संशयित इन्स्टाग्राम खातेधारकाने फिर्यादीच्या पत्नीबद्दल अत्यंत अश्लील मजकूर आपल्या स्टोरीमध्ये लिहिला होता. इतकेच नव्हे तर, फिर्यादी आणि गावातील एका महिलेचे छायाचित्र घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने (AI) आक्षेपार्ह फोटो तयार करण्यात आले. हे बनावट फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक करून दोघांचीही मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

​हा प्रकार मार्च महिन्यापासून सुरू होता. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा तांत्रिक शोध घेतला जात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
———————————————————————————————————————-

धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगर तालुक्यातील जेजुरी राणमळा परिसरात धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत अर्जुन मोरे हे नेभी येथील बिरोबा मंदिरामध्ये गेले होते. तेथे गर्दी असल्यामुळे त्यांचा धक्का एका व्यक्तीला लागला. याच कारणाचा राग धरून सचिन बाळासाहेब जयकर, सौरभ छबू जयकर, अभिजीत साहेबराव मोरे, सार्थक रभाजी जयकर आणि शुभम रभाजी जयकर यांनी बेकायदा मंडळी जमवून फिर्यादीला गाठले. “तू आमच्या माणसाला धक्का का दिला?” अशी विचारणा करत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

​संकेत यांनी हा धक्का चुकून लागल्याचे सांगूनही आरोपींनी त्यांचे काहीही ऐकले नाही. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सौरभ जयकर याने संकेत यांना जमिनीवर पाडले, तर सचिन जयकर याने आपल्याकडील चॉपरने संकेत यांच्या तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर संकेत मोरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खंडेराव शिंदे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles