विधान परिषदेच्या जागेची उमेदवारी मला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रयत्न करत आहे अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. पण या बातम्या निराधार आणि तथ्यहीन असल्याचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हंटले आहे. मी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त जागासाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळावी तिन्ही घटक पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुलगा अनिकेत तटकरे याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी हा खुलासा केला आहे.
अनिकेत तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यापूर्वी विधानपरिषदेवर निवडून गेले होते. पण त्यांचा कार्यकाळ संपला. सहा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूकच झाली नाही. त्यामुळे अनिकेत तटकरे यांना पून्हा या मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळू शकली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनिकेत तटकरे यांचे नाव पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.
या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी समाजमाध्यमांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. विधानपरिषदेच्या जागेसाठी मला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे प्रयत्न करत आहेत. या स्वरुपाच्या बातम्या तथ्यहीन आणि निराधार आहेत. या उमेदवारीसाछी मी स्पर्धेत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून मी पक्षवाढीसाठी कार्यरत असल्याचेही अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.


