बच्चू कडू यांनी प्रहार राजकीय पक्ष विलीन करुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे विलीनीकरण आणि पक्षप्रवेश झाला आहे. या प्रवेशावर बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली. “झेंडा हातात घेतला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, असे कडू यांनी सांगितले. सत्तेशिवाय पक्ष चालवणे फार कठीण असल्याची कबुली कडू यांनी दिली. याशिवाय त्यांचा राजकीय प्रवास, शेतकरी आंदोलन आणि विविध विषयांवर कडू यांनी भाष्य केले. न्यूज-१८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कडू बोलत होते.कडू बोलत होते.
शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय राजकीय परिस्थितीतून घेतल्याचे बच्चू कडू म्हणाले. पाचवेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि चारवेळा विजयी झालो हा एक प्रकारे इतिहासच असल्याचे कडू म्हणाले. “पहिल्यांदा जिंकून आल्यानंतर त्यावेळी स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी राज्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन देत राष्ट्रवादी प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण, ही ऑफर नाकारली होती”, असा खुलासाही बच्चू कडू यांनी केला.
“चळवळीतील माणसाला राजकारण साध्य का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. चळवळीतील सर्व नेते थांबले आहेत. राजू शेट्टी थांबले, अजित नवले आले नाहीत. विजय जावंधिया प्रचंड अभ्यासू नेते पण, लोकसभा खासदार होऊ शकत नाहीत ही आमच्यासाठी शोकांतिका होती. शरद जोशी राजकारणात पडले, बाबासाहेबांना पडावं लागलं, हे का होतंय हा मोठा प्रश्न आहे”, असे बच्चू कडू म्हणाले. “झेंडा बदलला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, अशा शब्दात कडू यांनी भूमिका स्पष्ट केली.
सत्तेशिवाय पक्ष चालवणे कठीण आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी “फार कठीण आहे”, असे उत्तर दिले. “पहिल्यांदा पत्रिका घेऊन आलेले तान्हाजी लढाईला निघून गेले. पण, आता लग्नाला आले नाही म्हणून कार्यकर्ता तुटतो, अशा कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे”, असे कडू म्हणाले. “तळागाळातले किती नेते वर आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका -एका घरात चार – चार आमदार – खासदार – मंत्री असतात? हे कसं पचवून घेतात लोकं. बच्चू कडू गुवाहाटीला गेले म्हणून पडले सांगतात, पण गुवाहाटीला गेलेले इतर सर्व निवडून आले. मग माझे काय पाप होते? पक्ष नव्हता, जात नव्हती म्हणूनच ना?”, असेही कडू म्हणाले.


