आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आवडीच्या शाळा न मिळाल्यामुळे अनेक पालकांनी प्रवेश निश्चिती केलेली नाही. त्यामुळे शिक्षणविभागाने पालकांना प्रवेश निश्चितीसाठी शेवटची संधी दिली आहे. रायगड जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २७० शाळांमध्ये ४ हजार ७८४ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी ९ हजार ४८९ अर्ज दाखल झाले होते. लॉटरी प्रक्रियेद्वारे ४ हजार ३४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली; मात्र त्यापैकी आतापर्यंत फक्त ३ हजार ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
उर्वरित पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्याने अनेक जागा अद्याप रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पसंतीच्या नामांकित शाळांचा कोटा पूर्ण झाल्यामुळे इतर शाळांमध्ये प्रवेश घेण्यास पालकांकडून अनुत्सुकता दिसून येत आहे. परिणामी, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना मोफत शिक्षणाची संधी असूनही त्या जागा भरल्या जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १ हजार ३०३ विद्यार्थ्यांच्या आरटीई अंतर्गत प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या आरटीई कक्षांमार्फत कागदपत्र पडताळणी सुरू असून, ८ मेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पालकांनी जन्मदाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा व आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र सादर करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी केले आहे.आरटीईच्या माध्यमातून शिक्षणाच्या समान संधी देण्याचा उद्देश असला, तरी पालकांच्या पसंती-अपसंततीमुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसमोर आव्हाने निर्माण होत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के सन 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नावनोंदणी झाल्यानंतर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली होती. या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्याथ्र्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र प्रवेशनिश्चिती न झाल्याने आता ८ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी पालकांना शेवटची संधी; शिक्षण विभागाकडून प्रवेश निश्चितीसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ….
- Advertisement -


