कर्जत-तरुणाला तरुणीसोबत फिरताना काही जणांनी पाहिल्याने वाद निर्माण झाला आणि त्यातून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेच्या धक्क्यातून 20 वर्षीय ओंकार सुभाष एकाड (रा. खांडवी, ता. कर्जत) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सुभाष बलभीम एकाड यांनी फिर्याद दिली आहे की, यात्रेच्या वेळी ओंकार हा एका तरुणीसोबत फिरत असताना काही नातेवाईकांच्या नजरेस पडला. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते, त्यानंतर झालेल्या वादातून संबंधितांनी त्याला गावातच जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यानंतर ही त्याला जिवे मारण्याबद्दल धमकावण्यात आले होते. या प्रकारानंतर ओंकार मानसिक तणावात गेला आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल व साक्षीदारांच्या जबाबांनंतर अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी खांडवी येथील ग्रामस्थांनी केली आहे.


