पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रकांत रथ यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री माध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील कारवाई करत आहेत.
सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रकांत रथ यांची हत्या नेमकं कशी झाली? घटनेवेळी काय घडलं आणि घटनेनंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काय आढळून आलं? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी चंद्रकांत रथ यांच्या गाडीला आधी घेरलं आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रकांत रथ यांच्या हत्येच्या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली असून या घटनेमुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, चंद्रकांत रथ हे घरी परतत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, एका चारचाकी वाहनाने आधी चंद्रकांत रथ यांची गाडी ओव्हरटेक केली आणि गाडी पुढे घेऊन गाडीचा वेग कमी केला. त्यानंतर पाठिमागून एक बाईकस्वार आला आणि रथ यांच्या कारच्या अगदी जवळ जात गोळीबार केला. या घटनेत चंद्रकांत रथ हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी चंद्रकांत रथ यांच्या चालकालाही गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
https://x.com/ANI/status/2052140148117360924?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2052140148117360924%7Ctwgr%5E3fa0a92fb053edf4eca2c3f15ba49ec2175ec914%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fcrime%2Fsuvendu-adhikaris-pa-shot-dead-in-bengal-bjp-alleges-abhishek-banerjee-orchestrated-the-death-case-tmcs-recognition-should-be-cancelled-1423087


