काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची जगताप कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
स्व. अरुण काकां जगताप यांचा अहिल्यानगर शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा – आमदार कदम
अहिल्यानगर : जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, समाजकार्यात अग्रस्थानी असलेले, स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी नुकतीच काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या भेटी दरम्यान आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्यासह कुटुंबीयांची त्यांनी विचारपूस केली आणि दुःखात सहभागी होत कुटुंबाला धीर दिला. यावेळी संवाद साधताना आमदार डॉ. कदम म्हणाले की, स्वर्गीय अरुणकाका जगताप हे केवळ राजकारणातले नेता नव्हते, तर ते एक प्रभावी समाजसेवक होते. आजच्या युवा पिढीने स्व. अरुण काकांचे विचार आत्मसात करावेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्याचा वारसा संग्राम जगताप आणि सचिन जगताप निश्चितच पुढे नेत आहेत. त्यांच्या माध्यमातून जगताप कुटुंबीयांचे सामाजिक योगदान अधिक प्रभावीपणे दिसून येत आहे. स्व. अरुण काकांचा अहिल्यानगर शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचेही आमदार कदम यांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वात शहरात विविध विकासकामे झाली. नागरिकांशी त्यांनी कायम स्नेहसंबंध ठेवले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक सच्चा समाजसेवक गमावल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.


