*इस्रायलमध्ये गृहआधारित काळजीवाहक पदांसाठी रोजगारसंधी*
अहिल्यानगर,: कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत इस्रायलमध्ये गृहआधारित काळजीवाहक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींसाठी परदेशात रोजगाराची उत्तम संधी निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश उगले यांनी केले आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार भारतीय व्यावसायिक काळजीवाहकांना मोठी मागणी निर्माण झाली असून इस्रायलमध्ये सुमारे २ हजार ५०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इस्रायलमधील युद्धग्रस्त नसलेल्या भागात गृहआधारित काळजीवाहक म्हणून नोकरीसाठी २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत.
उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान तसेच सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधित सेवेसाठी उमेदवारांनी भारतीय नियामक प्राधिकरणाने मान्यताप्राप्त किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. कार्यस्थळी प्रशिक्षणासह प्रमाणपत्र असणे आवश्यक असून नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स सहाय्यक किंवा प्रसूती परिचर्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही अर्जासाठी पात्र राहतील. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातून निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, व्हिसा व पासपोर्ट प्रक्रियेसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा तसेच राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भारतीय चलनानुसार दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन मिळणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल अधिकृत संकेतस्थळ येथे ऑनलाईन नोंदणी करून या रोजगारसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष अथवा ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे


