लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपरी निर्मळ येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या काळ्या धंद्यासाठी बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरविणार्या श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले. या अटकेमुळे प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता 13 झाली असून या रॅकेटचे धागेदोरे संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना पोलिसांच्या रडारवर श्रीरामपूर येथील डॉ. राज अजीज शेख (रा. वॉर्ड नं. 2) आले होते. बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणार्या प्रतिबंधित गोळ्यांचा पुरवठा डॉ. शेख यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने पहाटे श्रीरामपूर येथे कारवाई करून डॉ. शेख याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली, आरोपीला राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
आतापर्यंत या प्रकरणात भानसहिवरा येथील डॉ. राहुल भनगे, श्रीरामपूर येथील डॉ. रवींद्र कुटे व आता डॉ. राज शेख अशा एकूण 3 डॉक्टर, 4 एजंट आणि 6 नातेवाईक अशा एकूण 13 जणांना गजाआड करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांचा तपास इथेच थांबलेला नाही. गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे पोर्टेबल मशीन नेमके कोठून आले आणि ते खरेदी करण्यासाठी कोणत्या एजंटने मध्यस्थी केली, याची खात्रीशीर माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
या रॅकेटद्वारे ज्या महिलांनी गर्भलिंग निदान किंवा गर्भपात करून घेतला आहे त्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संशयित एजंटांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भपात करणार्या केंद्रांचे आणि त्यांना साथ देणार्यांचे धाबे दणाणले आहेत.


