उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि गेल्या १४ वर्षापासून शरद पवार आणि पुढे अजित पवार यांच्या पक्षात स्थिरवलेले माजी खासदार आनंद परांजपे यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहीली आहे. परांजपे यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर ते शिंदे यांच्या पक्षात महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी घेतील असे चित्र आहे. विशेष म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्वतः या पक्षप्रवेशासाठी आग्रही असून अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षातील एक मोठा नेता शिंदे सेनेच्या गळाला लागला आहे.
माजी खासदार आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) महत्वाचे नेते होते. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारी साठी इच्छुक असतानाही त्यांना पक्षाने वारंवार डावलले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद उमेदवारीत त्यांचे नाव आघाडीवर होते. परंतु पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारीत डावल्याने परांजपे नाराज होते. यातूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि ते शिंदे सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होती. असे असतानाच, गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांचा शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशाची औपचारिकता केवळ शिल्लक राहिली असून लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांना पक्षात घेण्यास काही नेत्यांनी विरोध केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे परांपजे यांच्या पक्ष प्रवेशासाठी आग्रही होते. यातूनच त्यांचा पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे परांपजे यांच्या पक्ष प्रवेशासाठी आग्रही होते. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणुक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र परांपजे हे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मैदाना उतरल्याचे चित्र दिसून आले होते. येथूनच त्यांच्यातील मैत्री वाढल्याची चर्चा होती.हे.


