पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं त्याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे. अशा वेळेला देशातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित रहावं. याआधी विविध मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठका झाल्या पण पंतप्रधान नव्हते. कधी राजनाथ सिंह होते, कधी आणखी कुणी होते. देशावर किती गंभीर परिणाम होईल हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहिलं पाहिजे.
तसेच, कोणी दुचाकीने प्रवास करतंय, कोणी पायी प्रवास करतंय मग तुम्ही या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार, असे पवार यांना विचारण्यात आले. याला उत्तर देताना आता हे किती दिवस चालणार हे माहिती नाही. हे फक्त एक किंवा दोन दिवसांसाठी असेल तर त्यात काहीही फरक पडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
यासह ज्या नेत्यांनी आपले ताफे सोडलेले आहेत त्यांनी त्यात सातत्य ठेवावे. देखावा करू नये. मोदी यांनी जे आवाहन केलेले आहे, त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही मत पवार यांनी व्यक्त केले.


