अहिल्यानगर-इन्स्टाग्रामवर बनावट ओळख निर्माण करून श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीला इंटरव्ह्यूच्या बहाण्याने राहुरी येथे बोलावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी ऋषिकेश सानप याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिला दिपाली कुलकर्णी नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघींमध्ये चॅटिंग सुरू झाले. संबंधित खात्यावरून स्वतःला राहुरी येथे बँकिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. तसेच नवीन उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना बँकेत नोकरी मिळवून देत असल्याची माहितीही देण्यात आली.
यानंतर दोन दिवसांनी ‘मी. ऋषिकेश २४ न्यूज’ या इन्स्टाग्राम खात्यावरूनही पीडित तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपले नाव ऋषिकेश सानप असल्याचे सांगितले. दिपाली कुलकर्णी ही आपल्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगत, आपणही बँकिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचा दावा त्याने केला. संबंधित खात्यांवरील माहिती आणि स्टेटस पाहून तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला.
चॅटिंगदरम्यान आरोपीने पीडितेशी मैत्री वाढली. इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यानंतर तरुणीने आरोपीला आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक इन्स्टाग्रामवर पाठवला. त्यानंतर आरोपीने मोबाईलवर संपर्क साधून पीडितेला राहुरी येथे इंटरव्ह्यूसाठी बोलावले. सुरुवातीला तरुणीने नकार दिला असता, तिची बदनामी करण्याची धमकी देत तू आली नाहीस तर तुझ्या घरच्यांना खोटे सांगून तुला बदनाम करीन, असे आरोपीने म्हटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
२८ एप्रिल रोजी दुपारी पीडिता राहुरी येथे आली. आरोपीने तिला कार्यालयात बोलावले होते; मात्र नंतर ऑफिसचा प्लॅन रद्द झाल्याचे सांगत एका हॉटेलमध्ये नेले. तेथे आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली. तसेच माझ्याशी संबंध ठेव, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केला. मात्र पीडितेने प्रसंगावधान राखत तेथून सुटका करून घेतली. यानंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी ऋषिकेश सानप याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


