मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होते. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.
प्रमुख मागण्या
१. कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत.
२. ५८ लाख नोंदींना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना त्वरित कुणबी-मराठा प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
३. सातारा गॅझेट लागू करा: सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तात्काळ लागू करण्यात यावा.
सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करीत असल्याने यावेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे


