नगर-पुणे महामार्गावरील पळवे खुर्द शिवार येथे गुरुवारी (१४ मे) चार वाहनांचा साखळी अपघात झाला. मठ वस्तीवरील घाणेगाव रोडलगत असलेल्या हॉटेल जय मल्हारसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आळंदी येथे विवाहासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींसह सुमारे ३५ जण जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सुप्यातील खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सर्व जखमींची खासदार निलेश लंके यांनी भेट घेत संवाद साधला. डॉक्टरांशी चर्चा करून सर्व जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गुरुवारी विवाह मुहूर्त असल्याने नगर-पुणे महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी होती. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील राजळे परिवारातील वऱ्हाडी मंडळी लक्झरी बसमधून आळंदीकडे विवाह सोहळ्यासाठी निघाली होती.
दरम्यान, जालना येथून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार अचानक लक्झरी बसला हुल देत पुढे गेली. मागून येणाऱ्या लक्झरी बस चालकाने कारला वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि लक्झरी बस थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या कंटेनरवर आदळली. लक्झरी बस आणि कंटेनरमधील घडक अत्यंत भीषण होती. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. लक्झरी बस आणि कंटेनरचे चालक वाहनांमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही चालकांना बाहेर काढले.
लक्झरी आणि कंटेनरच्या धडकेनंतर महामार्गावर अचानक वाहने थांबली. त्याचवेळी कंटेनरच्या मागून नगरकडे येणारी एसटी बसही वेगात येऊन कंटेनरला धडकली. या
अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.अपघाताला कारणीभूत ठरलेली स्विफ्ट डिझायर कार मात्र रस्त्यालगतच्या शेतामध्ये जाऊन थांबली.


