चुलत्यानेच केला पुतण्याचा खून ;पारनेर तालुक्यातील घटना

पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकरी संदीप खरमाळे यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत उलगडा करत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. संदीप खरमाळे यांच्या चुलत्यानेच, म्हणजे महेश हनुमंत खरमाळे (वय 45, रा. भुजबळ वस्ती, भांडगाव) याने घरगुती वादातून हातोड्याने डोक्यात वार करून त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. महेश खरमाळे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 10 लाख 84 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी (16 मे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सिध्देश संदीप खरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या वडिलांच्या डोक्यात घातक वार करून खून केला होता. तसेच घरातील सुमारे 12 लाख 70 हजार रूपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीस नेण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, संदीप मुरकुटे तसेच अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, आकाश काळे, विशाल तनपुरे आणि भगवान धुळे यांचा समावेश होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान महेश खरमाळे याच्यावर संशय निर्माण झाला. तो भांडगाव-जामगाव रस्त्यावरून दुचाकीवर जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या महेशने अखेर पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी (15 मे) पहाटे त्याने स्वतःच्या पुतण्याच्या घरी जाऊन हातोड्याने डोक्यात वार करून संदीप खरमाळे यांचा खून केला. त्यानंतर घरातील रोख रक्कम चोरून नेल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी महेश कडून 10 लाख 29 हजार रूपयांची रोकड, मोबाईल फोन, दुचाकी, मयताचे आधारकार्ड आणि एक पांढरी दोरी असा एकूण 10 लाख 84 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles